मुख्यमंत्री फडणवीस : कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन
शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी केवळ कर्जमाफी पुरेशी नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि आधुनिकीकरणावर आधारित कृषी व्यवस्था उभी करून उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील हे आव्हान लक्षात घेऊन कृषी महाविद्यालयांनी संशोधन करून त्याचा प्रत्यक्ष लाभशेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
मौजे चाचडगाव (ता. दिंडोरी) येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन समारंभाप्रसंगी शुक्रवारी (ता. २८) ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्यातील सुमारे ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांची गुंतवणूक क्षमता मर्यादित आहे. दुसरीकडे शेतीचा उत्पादनखर्च सातत्याने वाढतो. या परिस्थितीत संशोधनाला चालना देऊन कमी खर्चात अधिक उत्पादन येण्याचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केल्यास उत्पादनखर्च २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी, तर उत्पादकता ४० टक्क्यांपर्यंत वाढविता येते. यासाठी राज्याने देशात प्रथमच कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित महाविस्तार अॅप’ विकसित केले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना संपूर्ण पीकसाखळीबाबत मार्गदर्शन, तसेच विविध भाषांमध्ये त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘मविप्र संस्थेचे महाविद्यालय भविष्यात कृषी संशोधनात भरीव योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘मविप्र पत्रिका’च्या विशेषांकाचे प्रकाशन झाले. तसेच, संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा निधीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. खासदार डॉ. शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे व भास्कर भगरे, आमदार डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, नितीन पवार व गोकुळ गिते, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, ‘मवित्र’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील विकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांच्यासह तालुका संचालक उपस्थित होते.
‘मविप्र ‘ला शतकोत्तर प्रोत्साहन निधी द्यावा : अॅड. ठाकरे
संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर केला. कर्मवीर बाबूराव ठाकरे प्लेसमेंट सेलद्वारे आतापर्यंत सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगारसंधी उपलब्ध केल्या आहेत. कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील व कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या कारकीर्दीचा गौरव करीत त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर विविध मागण्या मांडल्या. यात रावसाहेब थोरात यांच्यावरील धड्याचा पाठ्यपुस्तकात समावेश करणे, भागशाळेसाठी स्वतंत्र शाळा मंजूर करणे, टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारणे, कृषी विज्ञान केंद्र द्यावे, संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ग्रामीण शाळांच्या इमारतीसाठी १०० कोटी शतकोत्सर प्रोत्साहन निधी मंजूर करण्याची मागणी मांडली.
कृषी शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ घडवा : महाजन
पालकमंत्री महाजन म्हणाले, की हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन सक्षम करावे. कृषी व संबंधित क्षेत्रात रोजगार निर्माण करणारे विद्यार्थी, कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ घडविण्याचे काम महाविद्यालयाने करावे. ‘मविप्र’ चे जिल्ह्याच्या
सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक जडणघडणीत मोठे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १२ कोटी भाविक येणार असून, प्रशासनाला ‘मविप्र’ची मोठी मदत लागेल. अग्निशामक केंद्रासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘मविप्र’ ने दोन एकर जागा द्यावी, त्यासाठी आवश्यक टीडीआर दिला जाईल, अशी सूचना त्यांनी केली. ‘मविप्र’ वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेच्या भाडे कराराच्या मुदतवाढीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावल्याचे नमूद केले.










