उमराळे : मविप्र, कृषी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक, उमराळे बु (दिंडोरी) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराची ११ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली.शिबिराचे उद्घाटन मा. श्री. देवराम मोगल (उपसभापती, मविप्र समाज, नाशिक) यांच्या हस्ते झाले व त्यांनी सेंद्रिय शेती,नैसर्गिक शेती, माती परीक्षण, रेसिड्यू फ्री फार्मिंग अशा महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी डॉ. अजित मोरे, शिक्षण अधिकारी, मविप्र समाज, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . सरपंच वसंत भोये, ग्रामपंचायत अधिकारी सर्वेश पाटील, जनता विद्यालय उमराळे मुख्याध्यापक श्री पी. एम. कांबळे, संजय सोनवणे, गणपत भोये, नवनाथ धात्रक, एस. के. पाटील, अजित थेटे आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
डॉ. अजित मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या महत्त्वावर भाष्य करत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी या उपक्रमाची गरज स्पष्ट केली. महिला विषयक समस्या व त्या समस्यांचे गांभीर्याने निदान करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. डॉ. बी. डी. भाकरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली यामध्ये माती परीक्षण, एड्स जनजागृती, करियर गाइडन्स, मधमाशी पालनाचे महत्त्व व भाजीपाल्यातील कीड नियंत्रण, रक्तक्षय जनजागृती असे अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत असे संबोधित केले. तर सूत्रसंचालन कु. रुचिका चव्हाण हिने केले व आभार प्रदर्शन कुमार केशव पाचपेंड याने मानले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन हे प्रा. एस.यू. सूर्यवंशी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व प्रा. के. आर. भोईर,प्रा. एस. बी सातपुते, प्रा पी. एन. पाटील यांनी केले. शिबिर १७ फेब्रुवारीपर्यंत चालले असून विविध कृषी विषयक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना अनुभवसंपन्न होण्याची संधी मिळाली आहे.