कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे गंगापुर रोडवरील मविप्र शिक्षण संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयात “मिलेट महोत्सव-२०२५” आयोजित करण्यात आला होता. त्याचे उदघाटन कृषी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते (ता. ३१) झाले. या वेळी राज्य कृषी पणन मंडळ पुण्याचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे नाशिकचे उपसरव्यवस्थापक एस. वाय. पुरी, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. भाकरे, मिसेस इंडिया इंटरनॅशनल डॉ. शुभदा जगदाळे, प्राचार्य विलास देशमुख उपस्थित होते. ग्राहकांना ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ व नाविन्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. याचबरोबर मिलेट उत्पादन मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्व याविषयी नामांकित तज्ञाची मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्र प्रश्नमंजुषा, अनुभव कथन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
तृणधान्याचे महत्व अधिक लोकाभिमुख होण्यासाठी व शेतकऱ्यांना कायमस्वरुपी विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन कृषी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांनी केले.