मराठा विद्या प्रसारक समाजाच्या चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयात कृषी दिना निमित्त मंगळवारी (दि.१जुलै२०२५) कृषी दिनाच्या औचित्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मंचाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक प्रवीण जाधव, ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, विजय पगार, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, माजी नगरसेवक मनोहर बोराडे, कृषिभूषण भूषण निकम आदी उपस्थित होते.
महाविद्यालयातील सर्व सोयींनी सुस्सज अश्या “के डी एस पी स्पर्धा परीक्षा मंचाच्या” (KDSP Competitive Forum) स्वतंत्र दालनाचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी बोलताना प्राचार्यांनी स्पर्धा परिक्षा मंच स्थापनेमागची पार्श्वभूमी सांगितली. पदवी काळामध्येच महाविद्यालयातील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवा आणि तो अधिकारी बनावा यासाठी हा स्पर्धा परीक्षा मंच महत्वपूर्ण भूमिका पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सर्व सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या या महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मंचचा उपयोग अधिकारी बनून समाजाच्या, शेतकऱ्याच्या सेवेसाठी करण्याचे आवाहन केले. प्राध्यापक सुधीर शिंदे यांनी या स्पर्धा परीक्षा मंचाच्या सोयी बद्दल माहिती दिली. सदर स्पर्धा परीक्षा मंचाद्वारे विद्यार्थ्याना एम. पी. एस. सी, यू. पी. एस. सी, बँकिंग, भारतीय कृषि अनुसंधान परिषेद मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा यांसाठी लागणारी उत्तम प्रकाशनांची पुस्तके, महत्वपूर्ण मॅगझिन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासोबतच अभ्यासासाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा मंच दालन, ग्रंथालय, ई- ग्रंथालय उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षा तयारीच्या मार्गदर्शनासाठी तज्ञ मार्गदर्शक यांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.
या स्पर्धा परीक्षा मंचाच्या स्थापनेमुळे विद्यार्थी उत्साहात असून नक्कीच आमचे उज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करायला मदत होईल असा आशावाद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. प्राध्यापक नयन गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनी यज्ञा ठुबे हिने आभार मानले.
मविप्रच्या कृषी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मंचाची स्थापना